एमएसएमई क्षेत्र महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा कणा; नवउद्योजकांना सरकारची भक्कम साथ – उदय सामंत
एमएसएमई क्षेत्र महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा कणा; नवउद्योजकांना सरकारची भक्कम साथ – उदय सामंत
नवी मुंबई, दि. २८ :
जागतिक एमएसएमई दिनाचे औचित्य साधून सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे आयोजित ‘एमएसएमई समिट अँड अवॉर्ड्स’ सोहळ्यास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत तसेच रोजगारनिर्मितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राचे योगदान अतुलनीय आहे. या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विविध योजना आणि सवलतींच्या माध्यमातून उद्योगांना बळ दिले जात आहे.
ते पुढे म्हणाले की, नवीन पिढीने केवळ नोकरी शोधणारी न राहता ‘नोकरी देणारी’ बनण्याचा संकल्प करावा. विशेषतः महिला उद्योजकांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी शासनाकडून विशेष सवलती, आर्थिक सहाय्य आणि विविध प्रोत्साहनपर योजना राबविल्या जात आहेत.
नवउद्योजकांच्या कल्पकतेला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असून, महायुती सरकार ती प्रभावीपणे पार पाडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सन्मानित उद्योजक हे केवळ यशस्वी व्यावसायिक नसून महाराष्ट्राचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ असल्याचे सांगत, त्यांच्या यशातून हजारो युवक-युवतींना उद्योग क्षेत्रात उतरून रोजगारनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “तुम्ही उद्योग वाढवा, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त श्रीमती कादंबरी बलकवडे, जॉइंट सीईओ डॉ. कुणाल खेमनार, सचिव गोपाळ पुंगुलवार, पद्मश्री मिलिंद कांबळे तसेच एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांच्यासह अनेक उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.