आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

0
16
आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण
आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

आळंदीतील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

कर्करोगाच्या अचूक निदानासाठी महत्त्वाचे पाऊल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

आळंदी (पुणे), दि. २८ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक PET-CT (पेटसिटी) युनिटचे लोकार्पण करण्यात आले. या युनिटमुळे कर्करोगाच्या रुग्णांना अचूक निदान आणि वेळेवर उपचार उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, देशात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून या आजाराविरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी अचूक निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक आहेत. उपचारांना विलंब झाल्यास रुग्णांचा वेळ, आर्थिक खर्च आणि आजाराची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल, असे आश्वासन देत त्यांनी सांगितले की, रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात माफक दरात अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोगावरील उपचारांचा समावेश करण्यात आल्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी इंद्रायणी हॉस्पिटलच्या कार्याचेही कौतुक केले. व्यवसायिक दृष्टिकोन न ठेवता रुग्णांना माफक दरात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याचे या संस्थेचे कार्य सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अशीच निरंतर आणि समर्पित रुग्णसेवा सुरू राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉ. संजय देशमुख तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here