राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार

0
15
राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार
राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार

राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार

१.०२ कोटींहून अधिक बालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

मुंबई, दि. २८ : राज्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील अंदाजे १ कोटी २ लाख ९१ हजार ८१६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले होते.
राज्यभरातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. याशिवाय दुर्गम भागातील तसेच लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथकांनी घरोघरी भेटी देत लसीकरण केले.
पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस मिळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले. पालकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना लसीकरण केंद्रांवर आणून मोहिमेला सहकार्य केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीचा डोस पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, पोलिओमुक्त महाराष्ट्र आणि पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळाल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here