सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ उत्साहात संपन्न
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ उत्साहात संपन्न
भारतीय मूल्ये आणि नैतिकतेसह जागतिक नेतृत्व घडवा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे, दि. २८ : सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीदान समारंभ-२०२६ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. विविध देशांतील विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.
समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वेगाने बदलणाऱ्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये, करुणा, सामाजिक जबाबदारी आणि मानवी संवेदनशीलतेच्या आधारावर नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न करावा.
ते पुढे म्हणाले की, सिम्बायोसिसमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी आपल्या देशात परतल्यानंतर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारताचा सार्वभौम संदेश, भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्यांचा प्रसार करावा. शिक्षण हे केवळ ज्ञान मिळविण्याचे माध्यम नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी साधन आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी सिम्बायोसिस संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त तत्त्वज्ञानावर आधारित संस्था उभारून जगभरातील विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सिम्बायोसिस ही संस्था केवळ शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची आणि सामाजिक जाणिवेची जडणघडण करणारी संस्था असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
या कार्यक्रमास सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष व अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रामन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई येथील फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हेन्री तेबांडेके, विविध देशांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.