ऑपरेशन सिंदूरमधील सहा वीर जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये समाविष्ट
नवी दिल्ली, दि. २८ : ऑपरेशन सिंदूरदरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय लष्कराच्या पाच आणि भारतीय हवाई दलाच्या एका जवानाचे नाव राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या (National War Memorial) संकेतस्थळावरील ‘रोल ऑफ ऑनर’ विभागात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले आहे. या सहा शूरवीरांची नावे नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील ‘त्याग चक्र’ भिंतीवरही कोरण्यात येणार आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच या शहीद जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अधिकृत नोंदीमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, त्यांच्या शौर्याला राष्ट्राकडून औपचारिक अभिवादन करण्यात आले आहे.
‘रोल ऑफ ऑनर’मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वीर जवानांमध्ये सुबेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र), लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मूड मुरलीनाईक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि भारतीय हवाई दलाचे सार्जंट सुरेंद्र कुमार (वायु पदक) यांचा समावेश आहे.
दरम्यान, काही माध्यमांनी ही शहीद जवानांची पहिली अधिकृत ओळख जाहीर करण्यात आल्याचा दावा केला असला, तरी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की या जवानांना यापूर्वीही विविध स्तरांवर सार्वजनिकरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली होती. सध्या झालेली कारवाई म्हणजे त्यांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अधिकृत नोंदीत आणि स्मारकावर समाविष्ट करण्याची प्रक्रिया आहे.


