एसटीच्या उत्पन्न वाढीबाबत बैठक;अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिला आहे.
त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे. यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात, भाडेवाढ लागू असूनही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन महिन्यांतील ही घसरण गंभीर असून ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे एसटी महामंडळातील आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्च नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर आणि स्थानिक स्तरावरील नाविन्यपूर्ण उपक्रम या सर्व बाबींचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.


