अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करा – सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठक
ओरोस, दि. ३ :
आगामी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंधुनीती सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ तसेच विविध योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ अंतर्गत मंजूर योजनांच्या अंमलबजावणीचा योजनानिहाय आढावा घेतला. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी उपलब्ध अखर्चित निधी तात्काळ खर्च करून मंजूर विकासकामे निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
याशिवाय, अपूर्ण विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच ज्या कामांची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे तीही विलंब न लावता पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
विकासकामांच्या अंमलबजावणीत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर देत, सर्व विभागप्रमुखांनी कामांच्या दर्जाबाबत विशेष दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विविध योजनांअंतर्गत आवश्यक असलेले दायित्व निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीत अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांमधील खर्चाचा आढावा घेण्यात आला. या योजनांतील अखर्चित निधी त्वरित खर्च करून प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना देण्यात आले.
याशिवाय सिंधुरत्न समृद्ध योजना अंतर्गत दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत तसेच सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत प्रस्तावित विकासकामांचे आराखडे निर्धारित मुदतीत सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.