
सिंधुदुर्गात ५,११८ शेतकऱ्यांची कर्जखात्यांची तपासणी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ साठी पूर्ण
सिंधुदुर्ग –
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

त्यापैकी ४,००८ कर्जखाती पात्र ठरली असून, आतापर्यंत ३,९५६ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती ही माहिती सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी दिली.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आली. या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रीयीकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांमधील कर्जखात्यांची माहिती संबंधित बँकांच्या प्रधान कार्यालयांकडून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहे.
बँकांकडून माहिती अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय प्रणालीद्वारे सर्व माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या कर्जदारांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. या याद्या निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच स्थानिक स्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

