नवी मुंबई ऐरोलीतील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भावना पगारे निलंबित
नवी मुंबई ऐरोलीतील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भावना पगारे निलंबित
चौकशी समिती नियुक्त
नवी मुंबई, दि. ३ :
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना चौकशी अहवाल येईपर्यंत तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली असून, समितीला १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी आठ महिन्यांच्या गर्भवती सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार संबंधित इंजेक्शने देण्यात आली. त्यानंतर दोन्ही महिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता उपचार देण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सोनम डोंगरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता अद्याप अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे, सर जे. जे. समूह रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे प्रतिनिधी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणात वापरण्यात आलेल्या Inj. Duvadilan आणि Inj. Dexa Methasone या दोन्ही औषधांचा वापर तात्काळ स्थगित करण्यात आला असून उपलब्ध सर्व इंजेक्शन्स सीलबंद करण्यात आली आहेत. त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी ते अन्न व औषध प्रशासन (FDA), ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत उपचार करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांना २ जुलै २०२६ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, दिवंगत सोनम डोंगरे यांचे शवविच्छेदन त्यांच्या कुटुंबाच्या विनंतीनुसार सर जे. जे. समूह रुग्णालय व ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे करण्यात येत आहे. तर दुसऱ्या रुग्ण रिचा मिश्रा यांच्यावर वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष चौकशी समितीचा अहवाल आणि औषधांच्या प्रयोगशाळा तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.