रत्नागिरी विमानतळाचा ७५ टक्के टप्पा पूर्ण; तीन महिन्यांत पहिले विमान उड्डाण घेणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

0
23

रत्नागिरी विमानतळाचा ७५ टक्के टप्पा पूर्ण; तीन महिन्यांत पहिले विमान उड्डाण घेणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

भारतीय तटरक्षक दल व MADC मध्ये सामंजस्य करार

पर्यटन, निर्यात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना

रत्नागिरी, दि. ५ जुलै :
रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या रत्नागिरी विमानतळ प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाल्यानंतर विमानतळ प्रकल्पाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून पहिले विमान उड्डाण घेईल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.
रत्नागिरी येथील हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, MADC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, आयसीजीएएसचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, माजी आमदार विनय नातू, उद्योजक दीपक गद्रे, रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत पटवर्धन, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की, विमानतळाच्या उर्वरित भूसंपादन प्रक्रियेसाठी १० ते १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वात आकर्षक आणि आधुनिक विमानतळ उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यटनासाठी पंचतारांकित हॉटेल्स आणि ॲडव्हेंचर पार्क

रत्नागिरीतील पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी ‘ताज’, ‘ओबेरॉय’ किंवा ‘हयात’सारख्या पंचतारांकित हॉटेल समूहांना येथे गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच वन विभागाच्या जागेवर अत्याधुनिक ॲडव्हेंचर पार्क उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ‘ट्री हाऊस रेस्टॉरंट’ हे विशेष आकर्षण असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महिला बचत गटांना विमानतळावर विक्रीची संधी

स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विमानतळ परिसरात स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक महिलांना रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
हापूस आंबा आणि काजू निर्यातीला चालना
विमानतळ सुरू झाल्यानंतर रत्नागिरीचा जागतिक दर्जाचा हापूस आंबा, काजू आणि इतर कृषी उत्पादने थेट परदेशात निर्यात करणे अधिक सुलभ होईल. त्यामुळे स्थानिक उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी आर्थिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉ. उदय सामंत म्हणाले, “मी रायगडचा पालकमंत्री असताना नवी मुंबई विमानतळ, सिंधुदुर्गचा पालकमंत्री असताना चिपी विमानतळ सुरू झाले. आता रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून येथील विमानतळ सुरू होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
MADC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले की, “विमानतळामुळे पर्यटनासोबतच स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीलाही मोठी चालना मिळेल. जागतिक अभ्यासानुसार, विमानतळ यशस्वीपणे कार्यरत राहिल्यास त्या परिसराच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रादेशिक हवाई संपर्क वाढविण्यावर आमचा भर आहे.”
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक यांनी विमानतळ परिसरात स्वच्छता राखण्याचे आणि पक्ष्यांमुळे विमानांना धोका निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी केले, तर प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here