कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घटनास्थळी पाहणी
कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घटनास्थळी पाहणी
बोगद्याला कोणतीही हानी नाही; मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर, सुरक्षा पाहणीनंतरच वाहतुकीबाबत निर्णय
लोणावळा, दि. ७ जुलै :
मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड व माती घसरून खाली आली.
या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एंट्री पॉईंट परिसरातील संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या स्लॅबचा तसेच संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे डोंगरमाथ्यावरील परिस्थितीचे अचूक निरीक्षण करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी करण्यात येणार असून, पाण्याच्या प्रवाहात बदल होण्यामागील कारणांचा अभ्यास करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यात येतील.
दरम्यान, रस्त्यावर पडलेला स्लॅब आणि इतर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
रस्ता वाहतुकीसाठी सुरू करायचा अथवा नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त पाहणी व सुरक्षा मूल्यमापनानंतर घेतला जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व निर्णय घेतले जातील, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.