रत्नागिरीच्या विकास आराखड्याचा आढावा; अनावश्यक प्रस्ताव नकोत, शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच रोपे द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

0
18
रत्नागिरीच्या विकास आराखड्याचा आढावा; अनावश्यक प्रस्ताव नकोत, शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच रोपे द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरीच्या विकास आराखड्याचा आढावा; अनावश्यक प्रस्ताव नकोत, शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच रोपे द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरीच्या विकास आराखड्याचा आढावा; अनावश्यक प्रस्ताव नकोत, शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच रोपे द्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

भाड्याच्या इमारतीतील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय; विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा

रत्नागिरी, दि. ७ जुलै :
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी विभागप्रमुखांना विकासाच्या दृष्टीने उपयुक्त आणि गरजेचेच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्याच्या हिताशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रस्ताव पाठवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या अंगणवाड्या टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व विभागांनी शासनाकडे पाठविण्यात येणारे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच सादर करावेत, असेही निर्देश देण्यात आले.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी विविध विभागांकडे भूसंपादित होऊनही वापरात नसलेल्या शासकीय जमिनींची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले. जिल्हा उद्योग केंद्राने इमारतीतील गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करावी, तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनांचा आढावा घेण्यासाठी सर्व बँकांची बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
महिला व बाल विकास विभागाने ‘महिला सक्षमीकरण भवन’ उभारणीचा प्रस्ताव तयार करावा, तर लोटे परशुराम आणि रत्नागिरी येथे ईएसआय रुग्णालय सुरू करण्यासाठी कामगार विभागाने आवश्यक समन्वय साधावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
बैठकीत आमदार किरण सामंत यांनी शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन वन विभागाने गावनिहाय मागणीनुसार रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली. तसेच बचत भवनासाठी आराखडा तयार करणे, राजापूर येथे दूध शीतकरण केंद्र (चिलिंग प्लांट) उभारणे, प्रत्येक तालुक्यात मृदा परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, जनावरांच्या चाऱ्यासाठी नेपियर गवत लागवडीला प्रोत्साहन देणे, केटी वेअर बंधाऱ्यांची कामे आणि खारलँड भागातील बंधाऱ्यांचे प्रस्ताव तयार करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
नवीन पूल तसेच दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव छायाचित्रांसह तयार करून त्याची प्रत स्वतःकडे द्यावी. शासन स्तरावर या प्रस्तावांचा पाठपुरावा केला जाईल, असेही आमदार सामंत यांनी सांगितले.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव योगेश महांगडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here