मुसळधार पावसाचा मुंबई विमानतळावरील विमानसेवेवर मोठा परिणाम; ३६५ उड्डाणांना विलंब, १७ विमाने रद्द
मुसळधार पावसाचा मुंबई विमानतळावरील विमानसेवेवर मोठा परिणाम; ३६५ उड्डाणांना विलंब, १७ विमाने रद्द
खराब हवामानामुळे विमान वाहतूक विस्कळीत; प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन
मुंबई, दि. ७ जुलै :
मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवेलाही बसला आहे. खराब हवामानामुळे मध्यरात्री १२.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत तब्बल ३६५ उड्डाणांना विलंब झाला असून १७ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
सततचा पाऊस, कमी दृश्यमानता आणि प्रतिकूल हवामानामुळे विमानांच्या उड्डाण व लँडिंग प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवरील अनेक प्रवाशांना विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली.
विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती संबंधित विमान कंपनीकडून तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामानातील सुधारणा आणि सुरक्षिततेच्या निकषांनुसार विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.