MPSC भरती पुन्हा वादात! FDA परीक्षेचे 90 प्रश्न आधीच लीक झाल्याचा आरोप

0
13
सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध; पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे
सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध; पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे

MPSC भरती पुन्हा वादात! FDA परीक्षेचे 90 प्रश्न आधीच लीक झाल्याचा आरोप

आयोगाकडून चौकशी सुरू

मुंबई 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित अन्न व औषध प्रशासन (FDA) अंतर्गत औषध निरीक्षक (Food Inspector/Drug Inspector) भरती परीक्षेवर पेपरफुटीचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेतील तब्बल 100 पैकी 90 प्रश्न परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजेच 20 मार्च रोजी WhatsApp वर व्हायरल झाले होते, असा खळबळजनक दावा एका परीक्षार्थीने केला आहे.
या प्रकरणी संबंधित उमेदवाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेत FDA प्रशासनाने उमेदवाराचा जबाब नोंदवून त्याच्याकडील WhatsApp चॅट आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी संपूर्ण प्रकरण MPSC कडे पाठवण्यात आले आहे.
परीक्षार्थीचा गंभीर आरोप; ईमेलद्वारे केली अधिकृत तक्रार
परीक्षार्थी गौरव पाटील यांनी ईमेलद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेतील 100 पैकी 90 प्रश्न हे 20 मार्चलाच WhatsApp वर फिरत होते. त्यांनी असा आरोपही केला की, सुरुवातीला MPSC कडे तक्रार करूनही त्याकडे गांभीर्याने पाहण्यात आले नाही.
FDA ने जप्त केले WhatsApp चॅट आणि पुरावे
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन 24 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गौरव पाटील यांना चौकशीसाठी बोलावले. त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला गेला असून, त्यांनी सादर केलेले WhatsApp चॅट, स्क्रीनशॉट आणि इतर डिजिटल पुरावे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. हे सर्व पुरावे पुढील तपासासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले असून, आता आयोगाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MPSC ने आरोप फेटाळले; चौकशी सुरू असल्याचा दावा
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पेपरफुटीचे आरोप प्राथमिक स्तरावर फेटाळले आहेत. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, 22 मार्च रोजी परीक्षा पार पडली तेव्हा अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. निकाल जाहीर झाल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तथापि, प्राप्त तक्रारीच्या आधारे सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, चौकशीत पेपरफुटीचे आरोप निराधार असल्याचे निष्पन्न झाले आणि आयोगाची बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप करण्यात आल्याचे आढळल्यास, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशी अहवालाकडे हजारो MPSC उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here