दापोली-खेड मार्गावर दुर्दैवी अपघात; २२ वर्षीय युवतीचा मृत्यू, दुसरी जखमी

0
11
दापोली-खेड मार्गावर दुर्दैवी अपघात; २२ वर्षीय युवतीचा मृत्यू, दुसरी जखमी
दापोली-खेड मार्गावर दुर्दैवी अपघात; २२ वर्षीय युवतीचा मृत्यू, दुसरी जखमी

दापोली-खेड मार्गावर दुर्दैवी अपघात; २२ वर्षीय युवतीचा मृत्यू, दुसरी जखमी

वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकी घसरली; अर्धवट कठडे, संरक्षक भिंतींच्या कामाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

दापोली | प्रतिनिधी – अरविंद अनंत मांडवकर
दापोली- खेड मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान आणखी एका भीषण अपघाताने एक तरुणीचा बळी घेतला आहे. वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सेजल पांडुरंग भागवत (वय २२, रा. टेटवली-खुटाचा कोंड, सध्या विद्यापीठ चाळ, दापोली) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वैष्णवी चंद्रकांत आयरे (मूळ रा. असोंड, ता. दापोली, सध्या विद्यापीठ चाळ, दापोली) ही किरकोळ जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही युवती दुचाकीवरून दापोलीकडे येत असताना वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ दुचाकी अचानक घसरली. नियंत्रण सुटल्याने दोघीही दुचाकीसह रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या. या भीषण अपघातात सेजल भागवत गंभीर जखमी झाली. तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी दोन्ही युवतींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून समयसूचकता आणि कर्तव्यदक्षतेचे उदाहरण घालून दिले. त्यामुळे जखमींवर तातडीने उपचार सुरू होऊ शकले.
या घटनेनंतर दापोली-खेड मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण, कठडे अर्धवट अवस्थेत, तर काही ठिकाणी रस्त्यालगत योग्य सुरक्षा उपायांचा अभाव असल्याचे वाहनचालकांकडून वारंवार सांगितले जात आहे. नुकतेच याच मार्गावर रस्ता खचणे, खडी साचणे आणि वाहन घसरण्याच्या घटना घडल्या असून, त्यात आता एका तरुणीचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे पूर्ण करावेत, योग्य इशारा फलक लावावेत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा आणखी निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here