हुमरमळा-वालावल रस्त्यावरील पुलाला भगदाड; सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घ्यावी – अर्चना बंगे
वाहतूक ठप्प; विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थांची गैरसोय वाढली, अपघाताचा धोका
कुडाळ, दि. २७ जुलै :
हुमरमळा-वालावल-बिजोळेवाडी या महत्त्वाच्या मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वालावलच्या पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी केली आहे.
अर्चना बंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमरमळा-वालावल-बिजोळेवाडी-करमळीवाडी-गावधडवाडी ते आरकाचे पूल असा हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. बिजोळेवाडी येथील पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र सध्या पुलाला मोठे खड्डे पडले असून त्याखालील पाईपलाइनही फुटल्याने पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे.
पुलाच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. चारचाकी वाहने आणि रिक्षा या मार्गावरून जाणे बंद झाले असून विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली असून पुलाचे भगदाड आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अर्चना बंगे यांनी केली आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करत पुलाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाची तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.