संदीप राजपुरे यांना प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट; शैक्षणिक कार्याची दिल्लीत दखल
संदीप राजपुरे यांना प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट; शैक्षणिक कार्याची दिल्लीत दखल
दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
कोकणातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरविणारे शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र, पदक व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
संदीप राजपुरे यांच्या शैक्षणिक कार्याची दिल्लीत दखल
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही महानगरांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, या ध्येयाने संदीप राजपुरे यांनी उभारलेले शैक्षणिक विश्व आज कोकणातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षण, आरोग्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांपर्यंत विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली येथे श्री रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग,श्री रामराजे कॉलेज,श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल,पूज्य साने गुरुजी कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, पालगड, देवरुख येथे देवरूख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग,मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट,रत्नागिरी येथे रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि चिपळूण येथे श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत.
या संस्थांमार्फत B.Sc. Nursing, P.B. B.Sc. Nursing, G.N.M., A.N.M., B.P.Th. (Bachelor of Physiotherapy), D.Pharmacy, B.Pharmacy, B.Sc. Hospitality Studies, B.Com. Accounting & Finance, B.A.M.M.C., B.A. आणि B.Com,BCA, B.Sc.IT, BMS, D.Ed यांसारखे विविध पदवी, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती यामुळे या संस्था अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची, समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या अविरत कार्याची दखल घेत पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाने त्यांना हा सर्वोच्च मानद सन्मान बहाल केला आहे.
या गौरवामुळे संदीप राजपुरे यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावले असून, कोकणातील शिक्षण क्षेत्रासाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह माजी विद्यार्थी आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.