‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ ग्रंथ प्रकाशित
‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ ग्रंथ प्रकाशित; इतिहासप्रेमींसाठी पर्वणी
तंजावरच्या मराठा राजांचा वैभवशाली इतिहास मराठी वाचकांसमोर
पुणे :
इतिहास अभ्यासक, संशोधक आणि मराठी वाचकांसाठी आनंदाची बातमी ठरावी असा ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील भंडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत उत्साहात संपन्न झाला.
तंजावरचे युवराज प्रतापसिंहराजे सारफोजीराजे भोसले लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आणि संक्षिप्त सारांश प्रा. डॉ. मनोहर इंगळे यांनी केला असून या ग्रंथाचे प्रकाशन नागपूरचे युवराज राजे जयसिंह भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला तंजावरचे युवराज प्रतापसिंहराजे भोसले, गुरुवर्य सुचेता भिडे-चापेकर, प्रा. डॉ. मनोहर इंगळे यांच्यासह अनेक इतिहासप्रेमी, संशोधक आणि मान्यवर उपस्थित होते.
या ग्रंथामध्ये दक्षिण भारतात मराठा साम्राज्याची पताका फडकवणाऱ्या तंजावरच्या मराठा राजांचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचे प्रशासन कौशल्य, कला, साहित्य, शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रातील योगदान यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. तंजावरच्या मराठा राजघराण्याचा गौरवशाली वारसा आणि त्यांच्या कार्याची माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या पुस्तकाद्वारे होत आहे.
इतिहास संशोधनासाठी उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि मराठी वाचकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या ऐतिहासिक ग्रंथाच्या निर्मितीसाठी लेखक, अनुवादक आणि संपूर्ण कार्यसंघाचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.