अमरावतीतील पूरस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली माहिती
अमरावतीतील पूरस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली माहिती
प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश
अमरावती :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून परिस्थितीवर शासनाचे बारकाईने लक्ष असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.