मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.