लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण

0
31
लोकार्पणलोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण
लोकार्पणलोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण

मराठी साहित्य-संस्कृतीचे नवे प्रेरणास्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार

मुंबई :
मुंबईतील भायखळा येथे नूतनीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अत्याधुनिक नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत हे नाट्यगृह केवळ एक सांस्कृतिक वास्तू नसून मराठी अस्मिता, साहित्य, लोककला आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

शिंदे म्हणाले की, सकाळी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजनानंतर सायंकाळी नाट्यगृहाच्या लोकार्पणाचा योग आल्याने हा दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरी, लोककला आणि डफाच्या थापेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये आंदोलनाची ज्योत प्रज्वलित केली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नांविरोधात त्यांनी लोकजागृती करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मराठी नाट्यपरंपरेचे महत्त्व सांगताना शिंदे यांनी, “नाटक हा मराठी माणसाचा श्वास असून नाटक हे मराठी संस्कृतीचे पहिले प्रेम आहे,” असे नमूद केले. नूतनीकरणामुळे नाट्यगृहाची आसनक्षमता वाढली असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळेल, नवे कलावंत घडतील आणि मराठी साहित्य-संस्कृतीचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार प्रकाश सुर्वे, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, भाई गिरकर, माजी आमदार सदा सरवणकर, विविध लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here