रायगडमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगडमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांनी सतर्क राहावे
अलिबाग :
भारतीय हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
३१ जुलै रोजी जिल्ह्यात काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग झोतांसह ७० किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो.
१ ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून ३ आणि ४ ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नदी-नाले, धबधबे, पूरग्रस्त भाग तसेच समुद्रकिनारी अनावश्यक जाणे टाळावे. मासेमार, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासन व हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.