तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) देशभरातील १९ किलोच्या व्यावसायिक द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर सुमारे २०० रुपयांची कपात जाहीर केली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर करण्यात आलेली ही सलग दुसरी दरकपात आहे. यापूर्वी चार टप्प्यांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात एकूण सुमारे १,३४५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, प्रामुख्याने स्थलांतरित कामगारांकडून वापरल्या जाणाऱ्या ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४६ रुपयांची घट करण्यात आली आहे.
दुसरीकडे, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) अर्थात जेट इंधनाच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एटीएफचा दर आता प्रति लिटर ११५ रुपये झाला आहे.
विशेष म्हणजे, १ जुलै रोजी एटीएफच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या महिनाभरात पुन्हा दरवाढ करण्यात आल्याने विमान वाहतूक क्षेत्राच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.