‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांमध्ये शेतीप्रेम आणि आधुनिक कृषीची जाणीव निर्माण होणार – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

0
66
‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा शुभारंभळा’ उपक्रमाचा शुभारंभ
‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ

‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांमध्ये शेतीप्रेम आणि आधुनिक कृषीची जाणीव निर्माण होणार – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

कुडाळ, दि. १ :
विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख आणि कृषी क्षेत्राबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ‘बांधावरची शाळा – एक दिवस शेतकऱ्यांसाठी, आपल्या अन्नदात्यांसाठी’ हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

शिक्षण विभाग आणि कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तेरसेबांबर्डे (ता. कुडाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तहसीलदार सचिन पाटील, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, शेतकरी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अन्नसुरक्षेचा भक्कम आधार आहे. विद्यार्थ्यांनी शेतीकडे पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांनी समृद्ध अशा आधुनिक क्षेत्राच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणे ही या उपक्रमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्गने यशस्वीपणे राबविलेला ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम काही वर्षांच्या खंडानंतर नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पुढील पिढीत शेतीप्रेम, श्रमसंस्कार आणि निसर्गाशी नाळ जोडण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात घेऊन जाऊन शेतीची ओळख करून देणे, मातीशी नाते निर्माण करणे आणि अन्नदात्याविषयी कृतज्ञतेची भावना विकसित करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रानभाज्या, पारंपरिक शेती अवजारे, विविध कृषी उत्पादने आणि आधुनिक शेतीविषयक माहितीच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले.
आजचे विद्यार्थीच उद्याचे जबाबदार नागरिक, प्रगतशील शेतकरी, कृषी उद्योजक आणि संशोधक बनतील. त्यासाठी बालवयातच शेतीशी त्यांचा भावनिक आणि बौद्धिक संबंध जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर सातत्याने राबविण्यात यावा. विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये सेंद्रिय पालेभाज्यांची लागवड करून शेतीचे प्रयोग करावेत आणि कृषी क्षेत्राकडे आकर्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल यांनी केले. त्यांनी उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये कृषीविषयक जाण, निसर्गप्रेम आणि श्रमसंस्कार रुजविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. आभार शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here