‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध – उदय सामंत
रत्नागिरी, दि. २ :
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ कार्यक्रमास मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.

उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, शासन आणि महसूल प्रशासन सर्वसामान्यांच्या दारी जाऊन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करत आहे. नागरिकांच्या महसुली अडीअडचणी, विविध दाखले व कागदपत्रांशी संबंधित प्रश्न जागेवरच सोडविणे तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.



