भविष्यातील तंत्रज्ञानासाठी विद्यार्थ्यांना नवी दिशा
नागपूर, दि. २ :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथील रामदेवबाबा विद्यापीठात NVIDIAच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘एआय सेंटर ऑफ कॉम्पिटन्सी’चे उद्घाटन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकॉन आणि क्वांटम कम्प्युटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करणे आणि नवोन्मेषाला चालना देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकॉन आणि क्वांटम कम्प्युटिंग ही तंत्रज्ञाने या शतकाच्या भविष्याला आकार देणारी महत्त्वाची साधने ठरणार आहेत. तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेता शैक्षणिक संस्थांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे.
क्वांटम कम्प्युटिंगमुळे संशोधन प्रक्रियेला अभूतपूर्व गती मिळत असून, बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या १,००० दिवसांत सुमारे ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, नोकऱ्या कमी होणार नाहीत, मात्र त्यांचे स्वरूप आणि आवश्यक कौशल्ये निश्चितच बदलतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहून शिक्षणाच्या पद्धतीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.
या नव्या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, संशोधनाच्या संधी आणि उद्योगक्षेत्राशी थेट जोडणारा मंच उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे.