साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून सत्कार
साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून सत्कार
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :
साम टीव्हीचे संपादक निलेश खरे (Nilesh Khare ) यांची छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत पत्रकारितेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे निलेश खरे हे आजही जमिनीवर पाय रोवून कार्यरत असल्याचे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे ते अनेक युवा पत्रकारांसाठी प्रेरणास्थान ठरल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
भेटीदरम्यान पत्रकारितेतील बदलते प्रवाह, समाजहिताचे विषय, माध्यमांची जबाबदारी तसेच डिजिटल युगातील पत्रकारितेची दिशा यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. समाजाप्रती उत्तरदायी पत्रकारिता आणि विश्वासार्ह वृत्तांकनाचे महत्त्व यावरही विचारांची देवाणघेवाण झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने निलेश खरे यांचा घड्याळ व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, मराठवाडा विभागाध्यक्ष अनिल सावंत, ज्येष्ठ पत्रकार अण्णा तसेच जिल्हाध्यक्ष छबुराव ताके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.