'व्हिजन दापोली'ची नवी झेप!
आधुनिक शेती, कौशल्य शिक्षण आणि सर्वांगीण विकासातून घडणार उद्याचा सक्षम विद्यार्थी
व्हिजन दापोली’ची नवी झेप!
आधुनिक शेती, कौशल्य शिक्षण आणि सर्वांगीण विकासातून घडणार उद्याचा सक्षम विद्यार्थी
दापोली | प्रतिनिधी: अरविंद मांडवकर
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या नऊ वर्षांपासून राबविण्यात येणारा ‘व्हिजन दापोली’ उपक्रम आता अधिक व्यापक आणि नावीन्यपूर्ण स्वरूपात राबविण्यात येणार आहे. आधुनिक शेती, कौशल्याधारित शिक्षण, पर्यावरणपूरक उपक्रम, जीवनकौशल्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा समावेश करून ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, दापोली येथे ३ ऑगस्ट रोजी आयोजित व्हिजन दापोली मुख्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या प्रारंभी व्हिजन दापोलीचे सचिव सुनील कारखेले यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे २०१७-१८ पासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, पालकांचा शाळांवरील विश्वास दृढ करणे, पालक प्रबोधन, शिक्षक प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी राबविण्यात आलेल्या सात महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी सविस्तर मांडली.
सभापती उन्मेष राजे म्हणाले, “व्हिजन दापोली हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी काळानुरूप बदल करण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेत वर्षभर सेंद्रिय पालेभाज्यांची लागवड, शेतीविषयक प्रयोग आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित उपक्रम राबविले जातील. बालपणापासून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आकर्षण निर्माण करून स्वावलंबी आणि संवेदनशील पिढी घडविण्याचा हा प्रयत्न असेल.”
पंचायत समिती सदस्य तथा गटनेते निलेश शेठ यांनी शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य आणि उत्कृष्ट कार्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने नव्या उत्साहाने कार्य करण्याची गरज असून, समाजातील सर्व घटकांनी या शैक्षणिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीच्या प्रारंभी शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट यांनी आभार मानले.
यावेळी उपसभापती नम्रता तोडणकर, सदस्य श्रीराम इदाते, संदीप चिखले, सुचिता महाडिक, सुवर्णा खळे, शिक्षण विभागातील अधिकारी तसेच व्हिजन दापोली मुख्य समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच जीवनकौशल्य, कृषी, पर्यावरण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा संगम घडविणारा ‘व्हिजन दापोली’ हा उपक्रम ग्रामीण शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श विकास मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.