कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षण हीच अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षण हीच अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
कर्जत : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विविध कृषी संशोधन प्रकल्पांची पाहणी करत विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अन्नसुरक्षेसाठी संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांनी वर्षातून किमान एकदा कृषी अभ्यास सहलीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अनुभवातून मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारे असते, असे त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष भात लागवडीत सहभाग घेतला. तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान, स्पीड ब्रीडिंग केंद्र, यांत्रिकी भात लागवड प्रणाली आणि विविध संशोधन प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबत माहिती घेतली.
कृषी क्षेत्रातील संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शेतकरी शिक्षण यांचा समन्वय साधल्यास शेती अधिक उत्पादनक्षम होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी सक्षम, संपन्न आणि समाधानी असतील तरच देशाची अन्नसुरक्षा मजबूत होईल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना कृषी संशोधनाचे महत्त्व समजण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादनवाढीच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले.