कोकणी बाजारपेठ १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान कुडाळमध्ये; स्थानिक उद्योजकांना मिळणार व्यासपीठ
कोकणी बाजारपेठ १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान कुडाळमध्ये
स्थानिक उद्योजकांना मिळणार व्यासपीठ
कुडाळ, दि. ६ ऑगस्ट : कोकणातील उद्योजकांनी साकारलेली ‘कोकणी बाजारपेठ’ आता कुडाळकरांच्या भेटीला येत आहे. १९, २० आणि २१ ऑगस्ट या तीन दिवसांत महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे या विशेष प्रदर्शन-विक्री मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या बाजारपेठेत घरगुती खाद्यपदार्थ, आकर्षक दागिने, सुंदर साड्या, विविध प्रकारचे कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग आयटम्स, नैसर्गिक उत्पादने तसेच अनेक उपयुक्त वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
स्थानिक उद्योजक आणि महिला व्यावसायिकांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमामुळे मोठी संधी मिळणार आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रमैत्रिणींसोबत या बाजारपेठेला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“आपली बाजारपेठ, कोकणी बाजारपेठ” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम खरेदीसोबतच स्थानिक व्यवसायांना बळ देणारा ठरणार आहे.