निवृत्ती नियोजन व गुंतवणूक पर्यायांबाबत सविस्तर मार्गदर्शन
अलिबाग, दि. ६ ऑगस्ट : रायगड जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) प्रणालीचे लाभार्थी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी (ता. ६ ऑगस्ट) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एनपीएसमधील विविध गुंतवणूक पर्याय, परतावा आणि अन्य महत्त्वाच्या बाबींविषयी यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस एचडीएफसी लाईफचे सुशिल शुक्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुशिल शुक्ला यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रवेशापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. तसेच संचित निधीवरील परतावा, अन्युईटी पर्चेस (Annuity Purchase) आणि निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाच्या दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या निर्णयानुसार एनपीएस अंतर्गत स्तर-१ (Tier-I) मध्ये जमा असलेल्या अंशदानाच्या गुंतवणूक पर्यायांबाबत उदाहरणांसह माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनी कर्मचाऱ्यांना डिफॉल्ट स्कीममध्ये आवश्यक बदल करून अधिक चांगला परतावा मिळविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करण्याचे आवाहन केले. तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी एनपीएसमधील विविध गुंतवणूक पर्याय तसेच टर्म इन्शुरन्सबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेमुळे कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळाल्याने त्यांच्या निवृत्ती नियोजनास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.