ज्येष्ठ साहित्यिक ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे निधन
सुनेत्रा अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई, दि. ६ ऑगस्ट : ज्येष्ठ साहित्यिक, ललित लेखनातील संवेदनशील अभिव्यक्तीसाठी ओळखले जाणारे ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि जीवनातील साध्या अनुभवांना साहित्यिक अभिव्यक्ती देत श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी मराठी ललित साहित्य समृद्ध केले. ‘डोह’, ‘मनातल्या उन्हात’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती मराठी वाङ्मयाचा अमूल्य ठेवा आहेत.
तसेच ‘मौज’चे संपादक म्हणून त्यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्व. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. तसेच ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.