पोलीस दीदींचा विद्यार्थ्यांसाठी वंदे मातरम शाळेत ‘गुड टच – बॅड टच’ जनजागृती कार्यक्रम
पोलीस दीदींचा विद्यार्थ्यांसाठी वंदे मातरम शाळेत ‘गुड टच – बॅड टच’ जनजागृती कार्यक्रम
पेण, दि. ६ ऑगस्ट : विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वंदे मातरम शाळा, जोहे (ता. पेण, जि. रायगड) येथे “Good Touch – Bad Touch” या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात पोलीस दीदींनी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अयोग्य स्पर्शातील फरक समजावून सांगत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे महत्त्व, धोकादायक परिस्थिती ओळखणे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास ती लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलीस यांना त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबाबत आणि वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूक करत आत्मविश्वासाने व निर्भयपणे वागण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज असून, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“सुरक्षित बालपण – जागरूक मुलं, सुरक्षित समाज” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.