कळंबोलीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8अ चे नव्या जागेत उद्घाटन

0
9
कळंबोलीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8अ चे नव्या जागेत उद्घाटन
कळंबोलीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8अ चे नव्या जागेत उद्घाटन

कळंबोलीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8अ चे नव्या जागेत उद्घाटन

आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; २०० हून अधिक नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

पनवेल :
पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली गावातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8अ चे जुन्या कळंबोली प्रभाग समिती कार्यालयात स्थलांतरण करण्यात आले असून या नव्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचे तसेच विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता प्रतिम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त रवीकिरण घोडके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असून महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महापौर नितीन पाटील यांनी महापालिका सातत्याने दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. आरोग्य शिबिरांसारख्या उपक्रमांमधून सामाजिक हिताचे कार्यक्रम राबविले जात असून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगरसेवक रवी भगत यांनी कळंबोली परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि विस्तृत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 8अ चे स्थलांतरण प्रशस्त जागेत करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तायक्वांदो प्रशिक्षक सुभाष पाटील, विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच कळंबोली प्रभागात कार्यरत बीएलए आणि बीएलओ यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, आयोजित आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सर्वसाधारण वैद्यकीय तपासणीसह स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग आणि कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून मोफत तपासणी करण्यात आली. तसेच आयुष्मान भारत आणि आभा (ABHA) कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
रक्त तपासणी अंतर्गत RBS, T3, T4, TSH, LFT, RFT, मलेरिया, डेंग्यू आणि हिमोग्लोबिन (HB) यांसारख्या विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. आवश्यकतेनुसार नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा २०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here