दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार; मथुरभाई बुटाला हायस्कूलमध्ये ८५ हजारांच्या वह्यांचे वाटप

0
23
मथुरभाई बुटाला हायस्कूलमध्ये ८५ हजारांच्या वह्यांचे वाटप 
मथुरभाई बुटाला हायस्कूलमध्ये ८५ हजारांच्या वह्यांचे वाटप 

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार; मथुरभाई बुटाला हायस्कूलमध्ये ८५ हजारांच्या वह्यांचे वाटप 

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
गावतळे :
श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथे ईडी अँड एफ मॅन कमोडिटीज इंडिया प्रा. लि., सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था, सातारा आणि ध्यास परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना सुमारे ८५ हजार रुपये किमतीच्या वह्यांचे वाटप करण्यात आले.

दुर्गम भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भासणारी गरज लक्षात घेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

यावेळी ध्यास परिवाराचे सुदर्शन कानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,” असे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
विवेक इंदुलकर यांनी विद्यार्थ्यांना संकटांवर मात करण्याची प्रेरणा दिली. समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्तींनाही आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला; मात्र त्यांनी त्यावर विजय मिळवत आपले स्थान भक्कम केले, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्या भक्ती सावंत यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तसेच ध्यास परिवाराकडून शाळेला सातत्याने मिळणाऱ्या बहुमोल सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही ध्येयवेड्या युवकांकडून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास ईडी अँड एफ मॅन कमोडिटीज इंडिया प्रा. लि.चे संदीप कदम, अभय पाटील, ध्यास परिवाराचे विनय इंदुलकर, सुदर्शन कानडे, विवेक इंदुलकर तसेच सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था, सातारा येथील संजय कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार बी. जे. कुचुनुरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here