न्यायासाठीचा लढा, सत्याचा विजय; नवी मुंबईतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर FIR दाखल : भावनाताई घाणेकर
न्यायासाठीचा लढा, सत्याचा विजय; नवी मुंबईतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर FIR दाखल – भावनाताई घाणेकर
नवी मुंबई :
नवी मुंबईतील वनविभागाच्या सुमारे ५,००० कोटी रुपये किमतीच्या शेकडो एकर जमिनीशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात अखेर FIR दाखल झाल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. तब्बल वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर बिवलकर कुटुंबीयांविरोधात FIR दाखल झाल्याचे भावनाताई घाणेकर यांनी सांगितले.
या प्रकरणासंदर्भात १८ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सुमारे १२ हजार पानांचे पुरावे सार्वजनिक केल्याचा दावा घाणेकर यांनी केला. त्यानंतर संबंधित प्रकरणात FIR दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला तसेच आंदोलने करून प्रशासनाकडे आवाज उठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल एका वर्षानंतर बिवलकर कुटुंबीयांविरोधात FIR दाखल झाल्याने सरकारची हजारो कोटी रुपयांची जमीन वाचविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडल्याचे समाधान असल्याचे भावनाताई घाणेकर यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण लढ्यात आमदार रोहित पवार यांच्यासोबत ॲड. स्वप्नील इरपनवर यांच्यासह अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनांच्या वेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही उपस्थित राहून साथ दिल्याचे घाणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, FIR हा शेवट नसून सुरुवात आहे, असे स्पष्ट करत या प्रकरणातील प्रत्येक दोषीपर्यंत तपास पोहोचला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधारांवरही कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार भावनाताई घाणेकर यांनी व्यक्त केला.