देवगड आनंदवाडी बंदराच्या विकासासाठी ८५ कोटींचा निधी – पालकमंत्री नितेश राणे
-
मच्छीमारांच्या सूचनांनुसार कामांना प्राधान्य
देवगड :
सिंधुदुर्गच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या देवगड येथील आनंदवाडी बंदराची पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि विकासाबाबतच्या सूचना जाणून घेतल्या.

देवगड बंदराच्या सर्वांगीण विकासासाठी ८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीचा योग्य, नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने वापर करून देवगड बंदर १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्धार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
बंदराच्या विकासासाठी मच्छीमारांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. त्यामध्ये गाळ काढण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य, जेटीची कामे, छोट्या बोटींसाठी लँडिंग सुविधा, संरक्षण भिंत, पंप, कोल्ड स्टोरेज तसेच आवश्यक तांत्रिक सुविधांचा समावेश आहे.
बंदर विकासासाठी प्रस्तावित असलेल्या २२ कामांपैकी सुरुवातीच्या टप्प्यात कोणती चार-पाच कामे हाती घ्यायची, याचा प्राधान्यक्रम मच्छीमारांच्या सूचनांनुसार निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या बंदरापेक्षा भविष्यात अधिक आधुनिक, सक्षम आणि मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीला चालना देणारे देवगड बंदर उभे राहिले पाहिजे. देवगडच्या माध्यमातून केवळ बंदराचा विकास न करता संपूर्ण सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याचे नितेश राणे यांनी नमूद केले.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, बाळ खडपे, नगरसेवक बुवा तारी यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाचे टॅग :


