मानवाधिकार संरक्षण संघटनेतर्फे विशेष सत्कार; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
आचरा : विवेक परब
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी मोटारसायकलवरून काश्मीर, लडाख आणि सीमावर्ती भागात तब्बल ३,५०० किलोमीटरचा खडतर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रवासाच्या माध्यमातून त्यांनी संघटनेच्या मानवाधिकारविषयक कार्याचा प्रचार व प्रसार केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त संघटनेच्या कोकण विभागातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
मानवाधिकार संरक्षण संघटनेतर्फे विशेष सत्कार; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते प्रणय बांदिवडेकर यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी ते स्वखर्चाने योगदान देत असून, त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.
अमृतसरपासून सुरू झाला साहसी प्रवास
प्रणय बांदिवडेकर यांच्या साहसी प्रवासाची सुरुवात अमृतसर येथून झाली. सुवर्ण मंदिर आणि अटारी बॉर्डर मार्गे त्यांनी श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, झोजिला, कार्गिल, झंस्कार खोरे, लेह, नुब्रा व्हॅली, तुर्तुक, थांग, पँगाँग लेक, हानले, उमलिंग ला पास, डेमचोक, न्योमा, पुगा व्हॅली तसेच मनाली-लेह महामार्गावरील लाचुंग ला, नकीला, बारालाचा ला आदी दुर्गम व आव्हानात्मक भागांचा प्रवास केला. अखेरीस चंदीगड येथे त्यांच्या मोटारसायकल प्रवासाची सांगता झाली.
गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव
या कार्यक्रमात संघटनेतर्फे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी २०२६ मध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण गटातून द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या कु. सानवी नारायण दळवी हिच्यासह विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या कु. आर्या शांतिनाथ तेली आणि कु. आराध्य अनिल मटकर यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास कणकवली तालुकाध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे प्रोप्रायटर मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊसचे प्रोप्रायटर महेंद्र चव्हाण व सौ. महेंद्र चव्हाण, कणकवली तालुका सदस्य अक्षय शेडेकर, कीर्ती आंबेरकर, गडमठ गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कोकण विभागातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहस, सामाजिक बांधिलकी आणि मानवाधिकार जनजागृतीचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या प्रणय बांदिवडेकर यांच्या कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.