मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचे ११ दिवसांपासून उपोषण; मागण्या मान्य करण्याची मागणी
मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचे ११ दिवसांपासून उपोषण; मागण्या मान्य करण्याची मागणी
विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी गेल्या ११ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करावी, सेंट्रलाईज्ड किचन पद्धत बंद करावी, विदर्भात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थीनींच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी, शहराच्या बाहेरील वसतिगृहे मध्यवर्ती ठिकाणी हलवावीत, नोकरभरती करावी तसेच पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
उपोषणाला ११ दिवस उलटून गेल्याने यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर शासनाने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी सर्व मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मांजरी येथे उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या आणि अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर उद्या मार्ग निघाला नाही, तर आंदोलनात सहभागी होऊन ते अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे शासन आता या आंदोलनाबाबत कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.