‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – रोहयो मंत्री भरत गोगावले

0
26
‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – रोहयो मंत्री भरत गोगावले
‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – रोहयो मंत्री भरत गोगावले

‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – रोहयो मंत्री भरत गोगावले

पात्र नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश; ३१८ प्रकारची कामे घेण्याची सुविधा

मुंबई :
‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढविण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
रोजगार हमी विभाग हा सर्वसामान्यांच्या हाताला काम देणारा आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणारा महत्त्वाचा विभाग आहे. राज्यातील कोणत्याही पात्र नागरिकाला कामाची कमतरता भासू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही मंत्री गोगावले यांनी केले.
‘व्हीबी जी राम जी’ योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली असून, याअनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री गोगावले यांनी विविध जिल्ह्यांमधील योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले.

नंदुरबारच्या कामगिरीचे कौतुक

मंत्री गोगावले यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, बुलढाणा, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील चांगल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
ज्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी कामे सुरू आहेत, त्या जिल्ह्यांनी तातडीने कामांची संख्या वाढवून नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

३१८ प्रकारची कामे घेण्याची सुविधा

या योजनेअंतर्गत आता ३१८ प्रकारची कामे घेण्याची सुविधा उपलब्ध असून, त्यामध्ये घरकुलांसह विविध विकासकामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये योजनेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले.
शाळांमधील कंपाऊंडच्या भिंती, स्वच्छतागृहे आणि इतर भौतिक सुविधा निर्माण करण्याची कामे देखील या योजनेतून हाती घेता येणार आहेत. त्याचबरोबर आपत्ती निवारण, जलसंधारण, सिंचन विहिरी यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यावर भर देण्यात आला.

मजुरी वेळेत देण्यावर भर

योजनेअंतर्गत मजुरांना काम उपलब्ध होण्याबरोबरच मजुरीचे वेळेत वितरण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले. शासनामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here