औषध निरीक्षक गट-ब भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार
औषध निरीक्षक गट-ब भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार
मुंबई :
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
२२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयोगाच्या परीक्षांची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखणे तसेच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित ठेवणे या उद्देशाने भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, औषध निरीक्षक पदांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार असून, संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
फेरपरीक्षेची तारीख आणि अन्य आवश्यक तपशील आयोगाकडून स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.