महाराष्ट्रातील सागरी विकास प्रकल्पांना गती देण्याची मागणी; नितेश राणे यांची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी भेट
महाराष्ट्रातील सागरी विकास प्रकल्पांना गती देण्याची मागणी; नितेश राणे यांची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी भेट
नवी दिल्ली :
महाराष्ट्रातील सागरी व बंदर क्षेत्रातील पायाभूत विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली.
या भेटीत महाराष्ट्र सागरी मंडळाने सागरमाला २.० अंतर्गत प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. बंदराधारित विकास, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, किनारी व अंतर्गत जलमार्ग, सागरी पर्यटन तसेच किनारी समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या व्यवहार्य प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी लवकर सुरू करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
यासोबतच गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर आकारण्यात येणारे प्रति प्रवासी ₹९२.०४ शुल्क तर्कसंगत करावे, अशी मागणीही करण्यात आली. या शुल्कामुळे फेरी ऑपरेटर तसेच प्रवाशांवर येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.
दोन्ही मागण्यांबाबत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रातील बंदरे, जलमार्ग आणि सागरी पर्यटनाच्या विकासाला चालना मिळाल्यास किनारी भागातील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.