‘प्रो-गोविंदा लीग २०२६ – सीझन ४’चा वरळीत भव्य शुभारंभ
‘प्रो-गोविंदा लीग २०२६ – सीझन ४’चा वरळीत भव्य शुभारंभ
मुंबई :
महाराष्ट्राच्या समृद्ध आणि गौरवशाली संस्कृतीचे प्रतीक असलेल्या दहीहंडी उत्सवाला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावर नेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या **‘प्रो-गोविंदा लीग २०२६ – सीझन ४’**चा भव्य उद्घाटन सोहळा वरळी येथील एसव्हीपी स्टेडियममध्ये उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष व आयोजक पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या नियोजनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडीला केवळ पारंपरिक उत्सव न मानता त्याला साहसी आणि संघभावनेवर आधारित क्रीडा प्रकार म्हणून व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा या लीगचा प्रयत्न आहे.
यावेळी बोलताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दहीहंडी हा सामाजिक अभिसरण, एकता आणि भक्कम संघभावनेचा संदेश देणारा साहसी खेळ असल्याचे सांगितले. मानवी मनोरा उभारताना प्रत्येक गोविंदाचा एकमेकांवरील विश्वास आणि सहकार्य हे समाजाच्या एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दहीहंडी या पारंपरिक खेळाला भविष्यात ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रणजीत पाटील, प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष व आयोजक पूर्वेश प्रताप सरनाईक, शायना एन. सी. यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राची दहीहंडीची गौरवशाली परंपरा देश-विदेशात पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, सहभागी सर्व गोविंदा पथकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.