प्रभाग १३२ मधील विकासकामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा

0
15
प्रभाग १३२ मधील विकासकामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा
प्रभाग १३२ मधील विकासकामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा

प्रभाग १३२ मधील विकासकामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा

मुंबई : प्रभाग क्रमांक १३२ मधील विविध नागरी विकासकामांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कामांचा आढावा घेतला. आनंदजी जैन लेन, हरिदास खिमजी महाविद्यालयासमोरील परिसर तसेच विद्याविहार स्थानकाजवळील चित्तरंजन उद्यानाला भेट देत त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची माहिती घेतली.

काँक्रीट रस्त्यांच्या कामादरम्यान उघड्या राहिलेल्या धोकादायक विद्युत तारा, बंद दिवे तसेच खराब विद्युत खांबांची तातडीने दुरुस्ती करून त्यांना सुरक्षितरीत्या बंदिस्त करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शॉर्ट सर्किटसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
रस्त्यांच्या कामामुळे बाधित झालेल्या जलवाहिन्यांची केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता पाणीगळतीची समस्या कायमस्वरूपी सोडवून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.
चित्तरंजन उद्यानातील दिवाबत्ती, गॅझिबो, क्रीडा संकुल तसेच सीमाभिंतीची कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच सोमय्या नाल्याला संरक्षक भिंत बांधणे आणि प्रगती चाळीजवळ आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा कठडे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले.
नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे महापौर रितू तावडे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here