पर्यावरणपूरक राख्या बांधून अग्निशमन जवान व स्वच्छताकर्मींना विद्यार्थिनींचे अनोखे रक्षाबंधन
नवी मुंबईतील अग्निशमन दलातील जवान व स्वच्छताकर्मींना पर्यावरणपूरक राख्या बांधून विद्यार्थिनींचे अनोखे रक्षाबंधन
नवी मुंबई
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील जवानांना कापडाचा पुनर्वापर करून तयार केलेल्या (Recycled) पर्यावरणपूरक राख्या बांधून टिळक ज्युनिअर कॉलेज, नेरुळ तसेच केएलई कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स यांच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन साजरे केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समवेत आयोजित केलेल्या या उल्लेखनीय उपक्रमातून कपड्याचा पुनर्वापर, कचरा कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
पर्यावरणपूरक राख्यांच्या माध्यमातून निसर्गाशी नाते जपत, आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांप्रती विद्यार्थिनींनी कृतज्ञता व्यक्त केली आणि हा रक्षाबंधन सण खास पद्धतीने साजरा केला.
या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र दक्ष असणाऱ्या अग्निशमन जवानांच्या कामाप्रती आदर आणि आपुलकी, पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून नवी मुंबईतील विविध शाळांमध्ये विद्यार्थिनींनी स्वच्छतामित्रांना टाकाऊ साहित्यापासून तयार केलेल्या आकर्षक राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरे केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करताना विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली.
नेरूळ येथील एपीजे शाळेत विद्यार्थ्यांनी ई कचरा आणि प्लास्टिक कचरा याचे दुष्परिणाम समजून घेत, घरातील नादुरुस्त ई वेस्ट व प्लास्टिक वेस्ट मोठ्या प्रमाणात जमा केले. हा कचरा पर्यावरणात न मिसळता पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्याचा अभिनव उपक्रम यानिमित्त राबविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर आणि महापालिकेच्या थ्री आर सेंटर विषयी माहिती देण्यात आली.
स्वच्छताकर्मींबद्दल मनात असलेली आदराची व आपुलकीची भावना व्यक्त करणारा रक्षाबंधनाद्वारे कृतज्ञता उपक्रम नमुंमपा नेरूळ गाव शाळा क्र. १०, जुईनगर शाळा क्र. १७, शिरवणे शाळा क्र. १०१ व १५, कुकशेत शाळा क्र. ९२ व १२१, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. १२ सारसोळे, नमुंमपा शाळा शिवाजीनगर नेरूळ, एपीजे शाळा नेरूळ तसेच दिघा, सानपाडा, तुर्भे, घणसोली, ऐरोली, वाशी आणि कोपरखैरणे परिसरातील शाळांमध्ये अत्यंत उत्साहात राबविण्यात आला.
बहीण आणि भावांमधील नात्याचा अविष्कार करणारा रक्षाबंधनासारखा सण अग्निशमन आणि स्वच्छता यासाठी जागरूकतेने काम करणाऱ्या बांधवांना पर्यावरणपूरक राख्या बांधून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी साजरा केला आणि नवी मुंबई शहर हे कापडाचा पुनर्वापर करून केलेल्या राख्या बांधून पर्यावरणाप्रती जागरूकता जपतानाच समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांप्रती संवेदनशीलही आहे याचा प्रत्यय दिला.