नेपाळमध्ये अडकलेले रायगडमधील पर्यटक काठमांडूकडे रवाना; उद्या मायदेशी परतण्याची शक्यता

0
9
नेपाळमध्ये अडकलेले रायगडमधील पर्यटक काठमांडूकडे रवाना; उद्या मायदेशी परतण्याची शक्यता
नेपाळमध्ये अडकलेले रायगडमधील पर्यटक काठमांडूकडे रवाना; उद्या मायदेशी परतण्याची शक्यता

नेपाळमध्ये अडकलेले रायगडमधील पर्यटक काठमांडूकडे रवाना; उद्या मायदेशी परतण्याची शक्यता

रायगड :
नेपाळमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडमुळे अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अडकलेले सर्व पर्यटक पर्यायी मार्गाने काठमांडूकडे रवाना झाले असून, ते शनिवारी सायंकाळपर्यंत काठमांडू विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर नियोजित विमानाने हे सर्वजण मायदेशी परतणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
नेपाळच्या भोटेकोशी नदीच्या खोऱ्यात २६ ऑगस्ट २०२६ रोजी भीषण फ्लॅश फ्लडने हाहाकार माजवला. हिमालयीन भागात हिमनदी/बर्फ व खडकांच्या मोठ्या ढिगाऱ्यामुळे अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्याने संपर्कमार्ग खंडित झाले. त्यामुळे पर्यटक आणि यात्रेकरू विविध ठिकाणी अडकून पडले.
या नैसर्गिक आपत्तीचा फटका महाराष्ट्रातील पर्यटकांनाही बसला. रायगड जिल्ह्यातील ३७ जण नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात अडकले होते, अशी माहिती समोर आली होती. त्यापैकी रायगड, अलिबाग यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतील नागरिकांचा समावेश होता. महाराष्ट्र सरकार आणि केंद्राच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, अडकलेले रायगडमधील सर्व पर्यटक पर्यायी मार्गाने आज सकाळी काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मार्गातील परिस्थिती पाहता ते सायंकाळपर्यंत काठमांडू विमानतळावर पोहोचतील, अशी माहिती नातेवाईक दिलीप शेठ यांनी दिली.
या सर्व पर्यटकांची उद्याची विमानाची तिकिटे निश्चित असून, ते उद्याच भारतात परतणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी मदत आणि समन्वय साधल्याबद्दल दिलीप शेठ यांनी राज्य शासन आणि रायगड जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध झाला.
नेपाळमधील या आपत्तीनंतर महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने नियंत्रण कक्ष आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून समन्वय सुरू ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेकडो नागरिक नेपाळमध्ये असताना पुराचा तडाखा बसला होता; त्यापैकी अनेक जण सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here