सार्वजनिक परीक्षा सुधारणांसाठी केंद्र सरकारकडून नागरिकांच्या सूचना मागविल्या
सार्वजनिक परीक्षा सुधारणांसाठी केंद्र सरकारकडून नागरिकांच्या सूचना मागविल्या
विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह सर्व नागरिकांना सहभागाचे आवाहन; १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत सूचना पाठविण्याची संधी
नवी दिल्ली : सार्वजनिक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकांकडून सूचना आणि मते मागविली आहेत. सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेले उच्चाधिकार कार्यदल विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच देशातील प्रत्येक नागरिकाचे म्हणणे जाणून घेणार आहे.
परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहिताची करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा व्यवस्थेशी संबंधित अडचणी, सुधारणा करण्याच्या उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या याबाबत नागरिक आपले मत कार्यदलापर्यंत पोहोचवू शकतात.
सूचना देण्यासाठी व्हॉट्सॲप, अधिकृत वेबसाइट, टोल-फ्री क्रमांक किंवा ई-मेलचा वापर करता येणार आहे. नागरिकांना अवघ्या दोन मिनिटांत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपली सूचना पाठविता येणार आहे. सूचना इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नागरिकांनी आपले मत आणि सूचना १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात. अधिकाधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी या सार्वजनिक सल्लामसलत प्रक्रियेत सहभागी व्हावे, तसेच ही माहिती आपल्या मित्रपरिवार आणि विविध ग्रुपमध्ये शेअर करून इतरांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असून, प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे, असा संदेश देण्यात आला आहे.