बिरा ९१समोर पुन्हा दिवाळखोरीचे संकट; ₹११.७७ कोटींच्या थकबाकीप्रकरणी NCLT कारवाईची शक्यता

0
82
बिरा ९१समोर पुन्हा दिवाळखोरीचे संकट; ₹११.७७ कोटींच्या थकबाकीप्रकरणी NCLT कारवाईची शक्यता
बिरा ९१समोर पुन्हा दिवाळखोरीचे संकट; ₹११.७७ कोटींच्या थकबाकीप्रकरणी NCLT कारवाईची शक्यता

बिरा ९१समोर पुन्हा दिवाळखोरीचे संकट; ₹११.७७ कोटींच्या थकबाकीप्रकरणी NCLT कारवाईची शक्यता

मुंबई :
लोकप्रिय ‘बिरा ९१’ (Bira 91) या बिअर ब्रँडची मूळ कंपनी बी९ बेवरेजेस लिमिटेड पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडली आहे. हिंदुस्थान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने (HNGIL) तब्बल ११.७७ कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याचा आरोप करत बी९ बेवरेजेसला डिफॉल्ट नोटीस बजावली आहे. थकबाकीची रक्कम न भरल्यास कंपनीविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (NCLT) दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार, HNGIL ने जून आणि सप्टेंबर २०२४ मध्ये बी९ बेवरेजेसकडून मिळालेल्या तीन खरेदी आदेशांनुसार ५१ लाखांहून अधिक ६५० मिली क्षमतेच्या कस्टमाइज्ड अंबर काचेच्या बाटल्या तयार केल्या होत्या. या बाटल्यांच्या मोबदल्यापोटी बी९ बेवरेजेसकडे ११.७७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा HNGILने केला आहे.
यापूर्वी ६ मे २०२६ रोजी HNGILने बी९ बेवरेजेसला कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यामध्ये थकीत रक्कम भरण्याची मागणी करण्याबरोबरच तयार केलेल्या बाटल्यांचा साठा उचलण्यासाठी १५ दिवसांच्या आत निश्चित वेळापत्रक देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कंपनीकडून ना थकबाकीची रक्कम भरण्याची व्यवस्था करण्यात आली, ना बाटल्या उचलण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला, असा HNGILचा दावा आहे.
दरम्यान, जुलै २०२६ मध्ये बी९ बेवरेजेससमोरील एका मोठ्या आर्थिक आणि कर्जदारविषयक वादावर समझोता झाल्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांच्या नेतृत्वाखालील पुनर्रचना आणि पुनर्भांडवलीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. मात्र, नव्या थकबाकीच्या दाव्यामुळे कंपनीसमोरील आर्थिक अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर ‘बिरा ९१’च्या संस्थापकांनी पदाचा राजीनामा दिल्याचेही समोर आले आहे. कंपनीचे उत्पादन बंद असून मोठ्या कर्जाच्या ओझ्याचा सामना करावा लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
थकबाकीची रक्कम वेळेत न भरल्यास बी९ बेवरेजेसविरोधात NCLTमध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे ‘बिरा ९१’च्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here