पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘श्री रत्नागिरीचा राजा’चे जल्लोषात आगमन
रत्नागिरी :
रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’ श्री गणेशाचे अत्यंत मंगलमय वातावरणात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि अथांग जल्लोषात आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाने रत्नागिरी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बाप्पाचे विधिवत पूजन करून स्वागत केले. विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने रत्नागिरीसह संपूर्ण महाराष्ट्रावर सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची अखंड कृपा राहो, अशी प्रार्थना त्यांनी श्रीचरणी केली.
दरम्यान, ‘श्री रत्नागिरीचा राजा’चे स्वागत करण्यासाठी रत्नागिरीकर तरुणाईचा अथांग जनसागर उसळला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात भक्तांनी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.


