Home महाराष्ट्र ‘उरणकरांच्या जीवापेक्षा माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही’; अनधिकृत कंटेनर पार्किंगविरोधात नगराध्यक्षा भावना...
‘उरणकरांच्या जीवापेक्षा माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही’; अनधिकृत कंटेनर पार्किंगविरोधात नगराध्यक्षा भावना घाणेकर आक्रमक
उरण :
उरण ग्रामीण भागातील रस्त्यांवर होणाऱ्या अनधिकृत कंटेनर आणि ट्रेलर पार्किंगमुळे नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेल्या धोक्याची गंभीर दखल घेत उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी रात्री प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. भेंडखळपासून खोपटा पुलापर्यंत त्यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
उरण ग्रामीण भागातील नागरिकांनी रस्त्यांवरील अनधिकृत कंटेनर व ट्रेलर पार्किंगबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षा घाणेकर यांनी काल रात्री प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी GDL, न्यू मर्क्स, बामण लॉरी आणि Conex CFS परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच दुहेरी लेनमध्ये कंटेनर व ट्रेलर उभे असल्याचे निदर्शनास आले.
सार्वजनिक रस्त्यांचे अशा प्रकारे बेकायदेशीर पार्किंगमध्ये रूपांतर झाल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी उरणकरांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असून, रुग्णवाहिका, शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढला असून, यापूर्वी या परिसरात अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कारवाई होत नसेल, तर ही अनधिकृत पार्किंग नेमकी कोणाच्या दबावामुळे सुरू आहे, असा गंभीर सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी, “उरणकरांच्या जीवापेक्षा माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही,” असे ठामपणे सांगितले. अनधिकृत पार्किंगविरोधात आवश्यक ती कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.